कामोठेतील प्रभाग अधिकार्यांना विचारला जाब
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
खान्देश्वर रेल्वे स्थानकसमोरील बांधकामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शिवशाही सेनेतर्फे पालिका प्रभाग कार्यालयात सोमवारी (दि. 2) जोरदार आंदोलन करण्यात आले. राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल घेत व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची लेखी हमी पालिका प्रशासनाकडून शिवशाही सेनेला यावेळी देण्यात आली.
दोन आठवड्यांपूर्वी खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील भूखंडावर सुरु असलेल्या बांधकामादरम्यान दुर्घटना घडली होती. बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या खोदकामामुळे पदपथाचा काही भाग कोसळून रस्त्याचीदेखील हानी झाली होती. दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवशाही सेनेने दुर्घटनेस जबाबदार बांधकाम व्यावसायिकावर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्यासोबत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. शिवशाही सेनेच्या मागणीनुसार गुन्हा दाखल न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला होता. शिवशाही सेनेच्या मागणीनंतर दुर्घटनेस जबाबदार बांधकाम व्यावसायिकास नोटीस बजावत पालिका प्रशासनाने हात झटकल्याने संतप्त झालेल्या शिवशाही सेनेच्या कार्यकर्त्यांनी कामोठे वसाहतीमधील पालिकेचे प्रभाग कार्यालय गाठून प्रभाग अधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात सहभागी आंदोलकांकडून यावेळी मोठ्या प्रमाणात नामगजर करण्यात येत होता. आंदोकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाने नमते धोरण घेत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलकांकडून आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
शिवशाही सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुकेमुळे दुर्घटनेस जबाबदार बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनकडून सुरु करण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
– राजकुमार पाटील, संस्थापक अध्यक्ष, शिवशाही सेना