शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याचे पत्र
| खोपोली | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा करणार्या शाळांमधील शिळफाटा मीळ गाव येथील सनशाईन इंटरनॅशनल स्कूल आणि खोपोलीतील भारती अकॅडमी ज्यु. कॉलेज अनधिकृत असल्याचे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जाहीर केले असून, पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शहर व जिल्ह्यातील पालक धडपड करत असतात. यातून हे पालक अव्वाच्या सव्वा शुल्क भरून आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा खासगी शाळांमध्ये करत असतात. मात्र, अनेकदा या शाळाच अनधिकृत असण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी पंचायत समिती खालापूर गटविकास शिक्षणाधिकार्यांनी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शिळफाटा मीळ गाव येथे सनशाईन इंटरनॅशनल स्कूल इयत्ता 1 ते 5 वीपर्यंत शाळा 2024 साली सुरू केली आहे. शाळा तपासणी केली असता मान्यता पत्र आणि शासनाची परवानगी नसल्याने 8 मे 2025 रोजी शाळा बंद करण्यासाठीची नोटीस दिली आहे. तसेच, भारती अकॅडमी ज्यु. कॉलेज सीबीएस बोर्ड खोपोलीत सन 2019-20 सुरू आहे. अनेक पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. परवानगी नसल्यामुळे दंडात्मक कारवाई झाली आहे. शाळा व्यवस्थापकाने न्यायालयात दावा टाकला असून, तो सुरू आहे. शाळा बंद करण्यासाठी नंबर 423 दि.16-6-22, नंबर 3214, दि. 8-5-2022 रोजी नोटीस दिली असल्याची माहिती खालापूर गटविकास शिक्षणाधिकारी कैलास चोरामले दिली आहे. या शाळांमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. संस्था चालकांनी शाळा सुरू केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे चोरामले यांनी सांगितले आहे.