कर्मचारी मोबाईलमध्ये मश्गुल; अपघाताला खुले आमंत्रण!
| उरण | प्रतिनिधी |
‘पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरू नका’ असा मोठमोठ्या अक्षरात फलक झळकतो. पण, त्याच फलकाखाली उभ्या असलेल्या पंपावरील कर्मचारी मोबाईलमध्ये मश्गुल असल्याचे चित्र दिसून आले. नियम सर्वसामान्यांसाठी आणि मोकळेपणाचा खेळ कर्मचार्यांसाठी? अशीच काहीशी परिस्थिती येथे दिसून आली. उरण-बोकडविरा येथील एका पंपावर रविवारी घडलेली घटना म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ याच म्हणीची मूर्तिमंत प्रचिती देणारी ठरली.
पेट्रोलसारख्या अतिज्वलनशील पदार्थाच्या सान्निध्यात काम करताना एक चूकही जीव घेऊ शकते. पण, त्याची तमा ना त्या पंप कर्मचार्यांना होती, ना तेथील व्यवस्थापनाला! मोबाईलवर चॅटिंग, व्हॉट्सअॅप आणि कॉलमध्ये गर्क असलेल्या या कर्मचार्यांचे फोटो काही सतर्क वाहनचालकांनी टिपले. फोटो काढले जात असतानासुद्धा मोबाईलमध्ये डोळे गाडून बसलेल्या कर्मचार्यांना काहीच फरक पडत नव्हता, म्हणजे निर्ढावलेपणाला सीमाच राहिली नाही, असेच म्हणावे लागेल.
पेट्रोल भरताना वाहन बंद करणे, खाली उतरून थोडे बाजूला उभे राहणे, गॅसवरील वाहनांसाठी अतिरिक्त खबरदारी हे सारे नियम जाहीरपणे लिहिलेले असले तरी प्रत्यक्षात पाळले जातात का?
मोबाईल फोनमधून दिसणारे न दिसणारे इलेक्ट्रॉनिक स्पार्क्स हे पेट्रोलच्या वायूसोबत संपर्कात आल्यास स्फोट होऊ शकतो हे शास्त्रीय सत्य पंप कर्मचार्यांना माहिती नसावे का? की माहिती असूनही बेजबाबदार वर्तन करण्याची परवानगीच या यंत्रणांनी त्यांना दिली आहे?
वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करणार्या अशा कर्मचार्यांवर कोण कारवाई करणार? की प्रशासन एखादा स्फोट होईपर्यंत वाट पाहात बसणार? हे पाहता आता ‘ब्र’ज्ञान सांगणार्यांना जागवण्याची वेळ आली आहे. अन्यथा मोबाईलवरची एक ‘क्लिक’ अख्ख्या परिसराला उद्ध्वस्त करू शकते.