जनावरांना मिळणार पोषक चारा

पशुसंवर्धन विभागाचा स्तुत्य उपक्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दुधाळ जनावरांना पोषक आहार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने वैरण उत्पादन योजनेंतर्गत महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्वारी, बाजरी तसेच हायब्रीड मका पिकांची लागवड करण्यात येत असून, जिल्ह्यातील 1 हजार 562 लाभार्थ्यांना प्रत्येकी चार किलोप्रमाणे एकूण 6 हजार 248 किलो बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. शंभर टक्के अनुदानातून ही बियाणे उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे लाखो दुधाळ जनावरांना पोषक हिरवा चारा मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यात भातशेतीबरोबरच पशुपालन हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा व्यवसाय बनत चालला आहे. अनेक शेतकरी पोल्ट्री, बकरीपालन, मेंढीपालन तसेच गायी-म्हशींचे पालन करून आपली आर्थिक घडी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे 62 हजार 225 म्हशी, 90 हजार 188 बकऱ्या, 2 हजार 203 मेंढ्या आणि 1 लाख 76 हजार 906 गायींची नोंद असून, दूध विक्रीतून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. मात्र, दुधाळ जनावरांना योग्य आणि पोषक आहार न मिळाल्यास दूध उत्पादन घटते आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होते, अशी स्थिती निर्माण होते. ही समस्या ओळखून पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 25 लाख रुपयांच्या निधीतून वैरण उत्पादन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीत हायब्रीड मका पिकाची लागवड करता यावी, यासाठी महाबीज कंपनीमार्फत बियाणे वितरीत करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात या पिकाची लागवड केली आहे.

उन्हाळ्यात गवत सुकल्याने ओल्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. स्वतःच्या शेतातच पोषक वैरण तयार केल्याने शेतकऱ्यांची चाऱ्यासाठी होणारी वणवण थांबणार असून, दुधाळ जनावरांच्या उत्पादनक्षमतेतही वाढ होण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.

पोषक आहारावर दृष्टीक्षेप

तालुके शेतकरी संख्या वैरण संख्या (किलोनुसार)
तळा – 45180
उरण – 60240
म्हसळा – 60240
मुरुड – 75- 30075300
अलिबाग – 90360
खालापूर – 90360
श्रीवर्धन – 90360
पाली – 90360
पोलादपूर – 90360
पेण – 100400
रोहा – 130520
पनवेल – 140560
माणगाव – 160640
महाड – 170688
कर्जत – 172688
एकूण – 1,5626,248


Exit mobile version