शाखा अधिक गतिमान करा: बी. एच. गायकवाड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा शाखेचा वर्धापन दिन आज उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा होत आहे. आपणा सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. संस्था वाढीसाठी योगदान सर्वांचेच कायम राहिले आहे. संस्थेचे कार्य, धोरण तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवून शाखा अधिक गतिमान करा, असे आवाहन राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उत्तर शाखेचा वर्धापन दिन सोहळा नवीन पनवेल येथील भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र येथे शनिवारी (दि.4) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गायकवाड बोलत होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमा पवार, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु.जी. बोराडे, महिला कमिटी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष स्वाती शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्षदिपक गायकवाड, जयवंत लव्हाडे, उषा कांबळे, आनंद गायकवाड, ॲड. हेमंत शिंदे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्र शिक्षक, शिक्षिका, श्रामणेर, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना बी.एच. गायकवाड म्हणाले की, भारतीय बौद्ध महासभा ही राष्ट्रीय संस्था आहे. तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेली ही संस्था आहे. भारतीय बौद्ध महासभेचे देशामध्ये एक वेगळे स्थान आहे. संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्ता शिबीरापासून श्रामणेर, बौद्धाचार्य शिबीर घेऊन व्यक्तीला घडविण्याचे काम केले जाते. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. रायगड जिल्हा शाखेची सुरुवात खोपोलीतून झाली आहे. आज पनवेल येथे सुसज्ज अशा इमारतीमध्ये जिल्हा शाखेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. संस्थेचे विचार अधिक गतीमान करून संस्था वृंद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करा, असे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करून संस्थेचे पदाधिकारी, उपासक, उपासिकांना संबोधित केले. दरम्यान, संस्थेच्या पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.







