बँक ऑफ इंडिया रायगड विभागाचा स्तुत्य उपक्रम
| रायगड | प्रमोद जाधव |
सध्या रोखीतील व्यवहारापेक्षा ऑनलाईन आर्थिक व्यवहारांत वाढ होत आहे. मात्र, अनेकांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना देखील वाढत आहेत. त्यामुळे डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी बँक ऑफ इंडिया रायगड विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी जिल्ह्यात बँकेमार्फत सतर्कता जागृत अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना जागृत ठेवण्याचे काम सुरु केले आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊननंतर ऑनलाईन आर्थिक व्यवहारावर भर देण्यात आला आहे. घरबसल्या मोबाईलच्या एका क्लीकवर रुपयांची देवाण घेवाण होत आहे. बँकेचे कामकाजदेखील डिजीटल झाल्याने नागरिकांना मोबाईलवर बँकेची सर्व माहिती उपलब्ध होते. त्याचाच फायदा घेत काही मंडळी नागरिकांची डिजीटल फसवणूक करत आहेत. त्यामुळे डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी बँक ऑफ इंडिया रायगड विभागामार्फत सतर्कता जागृत अभियान सुरु करण्यात आले असून हे अभियान 17 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे.
झोनल मॅनेजर दीपन्विता साहनी व डेप्युटी झोनल मॅनेजर भरत सहाय यांच्या मार्गदर्शनानुसार बँक ऑफ इंडिया रायगड झोनतर्फे ग्रामीण व निमशहरी शाखांमध्ये विविध शाखांच्या शाखा व्यवस्थापकांद्वारे सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना फसवणुकीशी संबंधित माहिती देऊन जागरूक करण्याचे काम केले जात आहे. ओटीपी शेअर करू नका, एटीएम पिन आणि सायबरलिंक शेअर करू नका, जास्त व्याज असणारे कर्ज घेऊन कर्जाच्या विळख्यात अडकू नका, असे आवाहन ग्राहकांना केले जात आहे. डिजीटल फसवणूक कशा पद्धतीने होते, त्याची माहितीदेखील या सभेच्या माध्यमातून दिली जात आहे.
दरम्यान, रायगड विभागातील येणाऱ्या सर्व शाखांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेला ग्राहकांकडून तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असून रायगड जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून ओळखली जात आहे. आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार होत असताना ग्राहकांमध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहाराची माहिती देखील देण्याचे काम केले जात आहे.
आर्थिक व्यवहार डिजीटल व्हावेत, अशी शासनाची भुमिका आहे. त्यानुसार सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहे. आर्थिक व्यवहार डिजीटल होत असताना त्याची जागृकता नागरिकांमध्ये कायमच रहावी, त्यासाठी सतर्कता जागृत अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाखांद्वारे सभा घेऊन डिजीटल फसवणूकीची माहिती देण्याचे काम करण्यात आले आहे. हा उपक्रम जनतेसाठी फायदेशीर ठरणार आहे.
विजयकुमार कुलकर्णी,
जिल्हा अग्रणी प्रबंधक







