| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण व जंतूनिर्मूलन मोहिमेचा शुभारंभ बुधवारी दि.8 एप्रिल रोजी आकुर्ली येथे झाला. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन पार पडले. पनवेल तालुक्यात पहिल्यांदाच पहिल्यांदाच श्वानांचे निर्बीजीकरण होणार आहे.
पनवेल तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे श्वानांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक होते. दरवर्षी हजारो नागरिकांना कुत्रे चावे घेतात. त्या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील पाठपुरावा केला. पनवेलचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर आणि पशुसंवर्धन विभागांनी यासाठी पुढाकार घेतला.
वाढत्या भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पनवेल, ग्रामपंचायत आकुर्ली आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे परिसरात रेबीजसारख्या आजारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. निमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून हे करण्यात येणार आहे. परिसरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करावयाचे असल्यास त्या त्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अरुण भगत, रंजना वास्कर, भूपेंद्र पाटील, समीर वाठारकर, प्राची जाधव, आत्माराम भस्मा, राजेंद्र पाटील, वैशाली सावंत, अमित जाधव यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सदस्य ग्रामसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.







