नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर करा! डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मागणी

| सांगोला । प्रतिनिधी ।

सांगोला तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांचा हातात तोंडाशी आलेला घास वरून राजाने हिसकावून घेतला आहे. आतापर्यंत 333 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी संगेवाडी सर्कलमध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे लवकर पंचनामे करावे. शासनानेही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करावी अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

सांगोला तालुक्यामध्ये गेल्या तीन-साडेतीन वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे मुख्य साधन असलेले डाळिंब द्राक्ष बागा व इतर फळबागा या अतिवृष्टीमुळे नष्ट झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये तालुक्याचे अर्थचक्र पूर्णतः ठप्प झालेले आहे. त्यातच भरीस भर म्हणून पावसामुळे आता तोंडाशी आलेली पिके विशेषतः मका, बाजरी काही फळबागा या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. विमा कंपन्या शेतकर्‍यांचे रक्त शोषून घेण्याचे काम करतात.

विमा कंपन्या या केवळ कागदावरच राहिलेले आहेत. आधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. दीपावलीचा सण तोंडावर आला असताना असा तुगलकी अत्याचार निसर्गाकडून आणि अधिकार्‍याच्या गलाथंन कारभारामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील तमाम शेतकर्‍यांना न्याय द्यावा. तसेच अधिकार्‍याने वेळेत पंचनामे करून अहवाल शासन दरबारी ताबडतोब अहवाल सादर करावा अशी मागणी डॉ. देशमुख यांनी केली आहे.

सांगोला तालुक्यात या अगोदरच डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाल्या आहेत. त्यातच आता अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करावेत व शासनानेही दिवाळीपूर्वी तातडीने मदत जाहीर करावी.

डॉ. बाबासाहेब देशमुख.
Exit mobile version