सरकारी जमीन टोरंटच्या ताब्यात?

शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; 5 जूनला मोर्चाची घोषणा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल-खलाटी परिसरातील तब्बल 99 एकर महसूल जमीन टोरंट एनर्जी पॉवर स्टोरेज सोल्युशन लिमिटेड या खासगी कंपनीला 30 वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना बाबू घारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, स्थानिक जनतेच्या हक्काची जमीन खासगी कंपनीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. वन विभागानंतर आता महसूल विभागानेही टोरंट कंपनीसाठी लाल गालीचा अंथरला आहे, अशी टीका केली.

घारे यांच्या म्हणण्यानुसार, सावळे ते कोटींबे गावादरम्यानची सुमारे 37 हेक्टर (99 एकर) जमीन 6 मे 2026 रोजी 30 वर्षांच्या भाडेकरारावर कंपनीला देण्यात आली. या करारासाठी शासनाला केवळ 2 कोटी 80 लाख रुपये मिळाल्याचा दावा त्यांनी केला. ही जमीन सरकारी प्रकल्पासाठी वापरण्यात आली असती तर स्थानिकांना रोजगार आणि विकासाच्या संधी मिळाल्या असत्या, असेही त्यांनी सांगितले.

ढाक गावठाणावरही टोरंटची नजर?
ढाक येथील विस्तारित गावठाण क्षेत्रातील जमीनही टोरंट कंपनीकडून हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप घारे यांनी केला. यासंदर्भात ग्रामसेवकांशी चर्चा करण्यात आली असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन गावठाणाची जमीन कोणत्याही खासगी कंपनीला हस्तांतरित करू नये, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण दिनी आंदोलन
टोरंट प्रकल्पासह पोशीर आणि शिलार धरण प्रकल्पांच्या विरोधात 5 जून रोजी कर्जतमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. पर्यावरण, शेती आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी हा लढा असून प्रकल्पांविरोधातील जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित जमीन टोरंट कंपनीला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मी केवळ प्राधिकृत अधिकारी म्हणून काम पाहिले असून, शासनाच्या धोरणानुसार जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आली आहे.

– कर्जत तहसीलदार

Exit mobile version