शेतकऱ्यांची थट्टा! कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

आता 50 लाखांच्या भात बियाणे योजनेची घोषणा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे ‌‘वरातीमागून घोडे‌’ असेच चित्र समोर आले आहे. अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना, तातडीने मदतीची गरज होती. मात्र, पेरणीच्या दोन महिन्यांनंतर 75 टक्के अनुदानावरील भात बियाणे योजनेसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याने “शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे का?” असा संतप्त सवाल जिल्हाभरातून उपस्थित केला जात आहे.

रायगड जिल्ह्यात 21 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आणि रोपवाटिकेची कामे वेगाने पूर्ण केली. जिल्ह्यात सुमारे 6 हजार 400 हेक्टरवर रोपवाटिका तयार करण्यात आली होती. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 1,900 हेक्टर क्षेत्रावरील रोपे पाण्याखाली गेली. त्यामुळे अलिबाग, पेण, पाली, रोहा आदी तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी रोपे वाहून गेली, तर काही ठिकाणी उगवलीच नाहीत. काही ठिकाणी रोपे पाण्याखाली राहिल्यामुळे कुजली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी नवीन रोपे उपलब्ध नसल्याने लावणी रखडली आहे. अशा वेळी तातडीने बियाणे मिळणे अपेक्षित असताना, कृषी विभागाने आता योजनेची घोषणा केल्याने तिच्या वेळेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून 75 टक्के अनुदानावर भात बियाणे योजनेसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील सुमारे 12 ते 15 हजार शेतकऱ्यांना व्हरायटी 1153 या कमी कालावधीत येणाऱ्या भात बियाण्याचा लाभ दिला जाणार आहे. 110 ते 115 दिवसांत तयार होणाऱ्या या वाणाची 10 किलोची बॅग शेतकऱ्यांना केवळ 135 रुपयांत उपलब्ध होणार आहे. ही बियाणे महाबीजमार्फत वितरित केली जाणार असून, त्यासाठी सातबारा उतारा आवश्यक आहे.

मात्र, ऑनलाइन सर्व्हर डाऊन असल्याने सातबारा उतारे काढतानाही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लावणीची वेळ हातातून निसटत असताना आणि दुसरीकडे कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे.

मदत संकटात हवी..!
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर तातडीने बियाणे उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, लावणीचा हंगाम संपत असताना योजना जाहीर केल्याने कृषी विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेळ निघून गेल्यानंतर दिली जाणारी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर नव्हे, तर थट्टाच असल्याची भावना जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अलिबाग, पेणमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी उभारी देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत अनुदानतत्वावर बियाणे वाटप सुरू केले आहे. आतापर्यंत दीडशेहून अधिक बॅगा शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कमी कालावधीमध्ये येणारे बियाणांची व्हरायटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

– पवनकुमार नजन, कृषी विकास अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version