सामाजिक बहिष्काराचे आणखी एक प्रकरण

भोस्ते येथील 15 कुटुंबांवर गावकीचा बहिष्कार

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावामध्ये सुतार-लोहार समाज व कुणबी समाज यांची वस्ती जास्त आहे. परंतु, गावातील राजकारण करण्यासाठी काही मंडळींनी 14 ते 15 कुटुंबांना वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. वाळीत टाकलेल्या कुटुंबाजवळ कोणत्याही प्रकारचा संपर्क गाववाले ठेवू देत नाहीत, असा आरोप वाळीत कुटुंबांनी केला आहे.

वााळीत टाकलेल्या व्यक्तीजवळ कोणी बोलताना दिसल्यास किंवा संबंध ठेवताना दिसल्यास त्याच्याकडून दंड वसूल केला जातो. या गावामध्ये बारीक सारीक कारणावरून दंड करण्याची प्रथा चांगलीच जोमात सुरू असल्याचे पाहायला मिळते. वाळीत टाकलेल्या कुटुंबांमध्ये सुखदुःखामध्येदेखील सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर वाळीत टाकल्याचे प्रकरण काही ठराविक गाववाले नेहमीच दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. लोहार-सुतार समाजाची 14 ते 15 कुटुंबे व वाळीत आहेत. यामधील काही कुटुंबे मुंबई येथे राहत असली तरी सणासुदीला गावात आल्यानंतरदेखील त्यांच्याजवळ कोणीही संबंध ठेवत नाही. तसेच, कुणबी समाजातीलसुद्धा चार कुटुंबं गेल्या आठ वर्षांपासून वाळीत आहेत, अशी माहिती पीडित कुटुंबातील व्यक्तींनी दिली.

गाव मंडळाला ग्रामस्थांकडून दंड आकारण्याचा अधिकार कोणी दिला आहे? याचीदेखील चौकशी होणे गरजेचे आहे. गावात घडणाऱ्या काही क्षुल्लक कारणावरून कुटुंबांना वाळीत टाकण्याचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद आहे. तरी या गोष्टीबाबत महसूल प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व वाळीत टाकणाऱ्या नेतेमंडळींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गावातील वाळीत टाकलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

माझे कुटुंब, माझ्या दोन भावांची कुटुंबे व माझ्या मामाचे कुटुंब यांना आमच्या गावाने वाळीत टाकलेले आहे. माझे वडील मृत्यू झाल्यानंतरदेखील दिवस कार्यासाठी गावातील कोणीही मंडळी आली नव्हती. आम्हा वाळीत टाकलेल्या कुटुंबियांबरोबर कोणीही बोलताना दिसल्यास त्या व्यक्तीकडूनदेखील दंड वसूल केला जातो. आमच्याच गावातील वाळीत टाकलेल्या दोन महिलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता; परंतु त्यावरदेखील कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात शासनाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, हीच आमची इच्छा आहे.

अरुण चिमण,
वाळीत टाकलेले ग्रामस्थ
Exit mobile version