| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी येथे स्थित पाताळगंगा ॲडिशनल एमआयडीसी परिसरात आज पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. पिडिलाइट कंपनीजवळील एका औद्योगिक युनिटला अचानक भीषण आग लागली असून काही मिनिटांतच आगीने उग्र रूप धारण केले. परिसरात दाट काळा धूर पसरल्याने कामगार आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी रासायनिक प्रतिक्रिया, यांत्रिक बिघाड किंवा उत्पादन प्रक्रियेमधील त्रुटीचा तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. मात्र, आग मोठ्या प्रमाणात असल्याने आर्थिक नुकसान किती झाले याबाबत अद्याप स्पष्ट चित्र नाही.
पाताळगंगा एमआयडीसीमध्ये पुन्हा भीषण आग
