| नवी मुंबई | प्रतिनिधी |
अंशुमन झिंगरन याने जपानमधील त्सुगारू सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करत जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘ओशन्स सेव्हन’ हे आव्हान पूर्ण केले आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू असून, भारतातील केवळ तिसरा जलतरणपटू ठरला आहे. 30 जून 2026 रोजी अंशुमनने जपानमधील गोंगेन्झाकी ते फुकुशिमा असा त्सुगारू सामुद्रधुनीचा प्रवास अधिकृतपणे 12 तास, 39 मिनिटे आणि 29 सेकंदांत पूर्ण केला. या पोहण्याला त्सुगारू स्ट्रेट स्विमिंग फेडरेशन यांनी अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे. होंशू आणि होक्काइडो बेटांदरम्यानची सुमारे 19.5 किलोमीटर लांबीची ही सामुद्रधुनी तीव्र भोवरे, सतत बदलणारे समुद्री प्रवाह आणि अत्यंत अनिश्चित हवामानासाठी ओळखली जाते. ‘ओशन्स सेव्हन’मधील हा आशियाई टप्पा मानला जातो.
वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी, अंशुमनने जगातील सातही प्रतिष्ठित समुद्री सामुद्रधुनींचे पोहण्याचे आव्हान पूर्ण करून इतिहास रचला आहे. याआधी हा विक्रम नवी मुंबईच्याच प्रभात कोळी यांच्या नावावर होता. त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी ‘ओशन्स सेव्हन’ पूर्ण केले होते. अंशुमन आता रोहन मोरे आणि प्रभात कोळी यांच्यानंतर ही कामगिरी करणारा भारतातील तिसरा जलतरणपटू ठरला असून, भारताच्या खुल्या समुद्रातील जलतरण क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याची ही अभिमानास्पद नोंद आहे. अंशुमनने अवघ्या तीन वर्षांत ‘ओशन्स सेव्हन’मधील सातही आव्हाने पूर्ण केली. त्याच्या या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात 17 जुलै 2023 रोजी नॉर्थ चॅनेल येथून झाली. त्याने हा प्रवास 11 तास 28 मिनिटांत पूर्ण करत वयाच्या 18 वर्षे 125 दिवसांत हा पराक्रम करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू बनला. या कामगिरीची ग्रिनिज बुकमध्ये नोंद करण्यात आली.
अंशुमन ठरला ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू
