पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर

| रायगड | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती (अंतरिम) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षार्थी, पालक आणि शिक्षकांना या उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास 11 ते 17 मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता येणार आहेत.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आली होती. यंदा पाचवीच्या 96.61 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी 6 लाख 57 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 लाख 34 हजार 920 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर आठवीच्या 96.47 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 3 लाख 87 हजार 623 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 73 हजार 931 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता या परीक्षेची इयत्तानिहाय आणि पेपरनिहाय उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उत्तरसूचीवरील आक्षेपांसाठी पालकांना संकेतस्थळावर, तर शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये ही लिंक उपलब्ध आहे. ई-मेल किंवा प्रत्यक्ष स्वरूपात येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. केवळ ऑनलाईन अर्जांचीच दखल घेतली जाणार आहे. प्राप्त आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन त्यानंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाईल. उत्तरसूचीसोबतच विद्यार्थ्यांच्या अर्जातील दुरुस्तीसाठी ही 11 ते 17 मार्च दरम्यान मुदत देण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख, जात प्रवर्ग किंवा शाळा क्षेत्र यांसारख्या माहितीमध्ये त्रुटी असल्यास शाळांना त्यांच्या लॉगीनद्वारे ऑनलाईन दुरुस्ती करता येईल. मुदतीनंतर कोणत्याही बदलाचा विचार केला जाणार नसल्याचे आयुक्त महेश चोथे यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रामुख्याने पाचवीच्या मराठी आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या काठिण्यपातळीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष. अंतरिम उत्तरसूची कधी जाहीर केली जाते, याकडे लागले होते. आता राज्य परीक्षा परिषदेने उत्तरसूची जाहीर केल्याने कार्बन उत्तरपत्रिकेच्या आधारे विद्यार्थ्यांच्या उत्तरांची पडताळणी करणे शक्य होणार आहे. दरम्यान, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेनंतर चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही शिष्यवृत्ती घेतली जाणार आहे. त्यानुसार 26 एप्रिल रोजी परीक्षा घेतली जाणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

Exit mobile version