। अलिबाग /पेण । प्रतिनिधी ।
असेसमेंट उतारा देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकार्याने पाच हजारांची मागणी केली होती. ही लाच घेणे त्याला महागात पडले. नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला शुक्रवारी लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला.
परमेश्वर जाधव असे या लाचखोर ग्रामपंचायत अधिकार्याचे नाव आहे. हा पेण तालुक्यातील मळेघर येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे. पेशाने वकील असलेले तक्रारदार यांनी त्यांचे आशिलांना कोर्टाच्या कामासाठी आणि एमएसइबी येथे देण्यासाठी असेसमेंट उतार्याची आवश्यकता होती. मळेकर येथील ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे 17 मार्च रोजी उतार्यासाठी अर्ज केला होता. परंतु, ग्रामपंचायत अधिकारी याने त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. अखेर त्यांनी 10 एप्रिलला नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागातील अधिकार्यांनी पडताळणी करून सापळा रचला. शुक्रवारी (दि. 11) लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राज सुरु आहे. सरपंच व सदस्यपदांचा कार्यकाळ संपल्याने ग्रामसेवक अथवा प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींचा कारभार चालत आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत ग्रामपंचायत अधिकारी अशा प्रकारचा मनमानी कारभार करून सर्वसामान्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप होत आहे.