। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन येथील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) अलिबाग यांनी धडक कारवाई करत दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील गैरप्रकारांवर लगाम बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
श्रीवर्धन प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, तक्रार करण्यास कोणी पुढे येत नव्हते. म्हसळा तालुक्यातील पाभरे येथील एका शेतकऱ्याला सातबारा उताऱ्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रांत कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. अखेर संबंधित कर्मचाऱ्याने काम करून देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. त्यातील 30 हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी शेतकरी प्रांत कार्यालयात आला होता. लाच देण्यापूर्वी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून अलिबाग एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. या कारवाईत श्रीवर्धन प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, यापूर्वीही श्रीवर्धन तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. वारंवार अशा घटना घडत असतानाही महसूल विभागातील काही कर्मचारी नागरिकांकडून लाचेची मागणी करत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचा आरोप करत कोकण आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






