पोलादपूरात सरकारविरोधी घोषणाबाजी

| पोलादपूर । वार्ताहर ।

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेल्या मोर्चेकर्‍यांनी पोलादपूर पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये प्रचंड घोषणाबाजी सुरू केली असताना त्यांच्यासमोरच महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती सांगण्यासाठी पथनाटयाचे आयोजन खरसई येथील अरूणोदय सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्यावतीने करण्यात आले.

तालुक्यातील सरकारी, निमसरकारी तसेच प्राथमिक शिक्षक व महसूल कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मंगळवारी दुपारी पोलादपूर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर पोलादपूर पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये या मोर्चेकरी महिला व पुरूष कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळीच पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून निवडणूक नायब तहसिलदार समीर देसाई यांच्या उपस्थितीत अरूणोदय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने पोलादपूर तालुक्यात गर्दीच्या ठिकाणी पथनाटयाचे सादरीकरण करण्यासंदर्भात विचारणा झाली असता सुमारे 200 हून अधिक संख्येने उपस्थित असलेल्या मोर्चेकर्‍यांसमोर महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पथनाटयाचे आयोजन करण्याचे ठरले.

अरूणोदय सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे संचालक किशोर शिताळे, शिवानी वर्मा, प्रतिक कांबळे, धनश्री मेंदाडकर, स्नेहा खोत, दिव्या पाटील, हिताली म्हात्रे, वैभव कांबळे, प्रसिक वर्मा, निहार धुमाळ, हेमंत पयेर आदींनी पोलादपूर शहरातील पंचायत समिती कार्यालय, पोलादपूर एस.टी.स्थानक आणि गांधी चौक बाजारपेठ तसेच चोळईतील सुंदरराव मोरे महाविद्यालय, कापडे बुद्रुक आणि लोहारे या ठिकाणी पथनाटयाचे सादरीकरण केले.

Exit mobile version