अलिबागमध्ये अँटी-रेबीज लसीकरण

| कोर्लई | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने जागतिक रेबीज दिनानिमित्त अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान शहरातील एकूण 35 प्राण्यांचे मोफत अँटी-रेबीज लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 19 कुत्रे व 16 मांजरींचा समावेश होता. प्राण्यांना रेबीजपासून सुरक्षित ठेवण्यासोबतच नागरिकांमध्ये रेबीज प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी अलिबाग जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कांबळी, डॉ.प्रियंका रोकडे, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या समन्वयक ममता म्हात्रे, अंकिता मोरे तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम अतिशय नियोजनबद्ध आणि व्यवस्थितरीत्या पार पडला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. रेबीज हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा गंभीर आजार असून, वेळीच लसीकरण केल्यास त्याचा प्रतिबंध करता येतो. त्यामुळे पाळीव तसेच भटक्या प्राण्यांचे नियमित लसीकरण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Exit mobile version