जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आदेश
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत.
जिल्ह्याच्या दि.2 जानेवारी 2022 च्या कोविड अहवालानुसार जिल्ह्यात विद्यमान रुग्ण 980 असून 288 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ऑक्सिजन बेडवर असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 76 आहे तर अतिदक्षता विभागात 14 रुग्ण दाखल आहेत. ही परिस्थिती निश्चितच काळजी करण्यासारखी आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा अद्याप दुसरा डोस बाकी असलेल्यांची संख्या जवळपास 3 लाख 44 हजार 283 असून अजूनपर्यंत पहिला डोसही न घेतलेल्यांची संख्याही 1 लाख 12 हजार 429 आहे, सद्य:परिस्थितीत यांच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे.
या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी तात्काळ औषधोपचाराबरोबरच कोविड लसीकरण, ॲन्टिजन व आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच अभ्यागतांची ॲन्टिजन टेस्ट सुरु करण्याचे सूचित केले आहे. याकरिता त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांना आवश्यक व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करावे, कायम मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे, आगामी काळात लग्नसराई किंवा इतर कार्यक्रम, सण साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने एकत्र येवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.