दोन्ही शिवसेना एकत्र येणार?

राजकारणात कधीही काहीही घडू शकते; पालकमंत्री भरत गोगावले यांचे सूचक विधान

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दोन्ही शिवसेना एकत्र येणार की नाही, याबाबतच्या चर्चांना पालकमंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी (दि. 12) नवा राजकीय ट्विस्ट दिला. सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही शिवसेना एकत्र येतील, असे वाटत नाही; मात्र राजकारणात कधीही काहीही घडू शकते, असे सूचक विधान त्यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे शिवसेनेच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले होते. यावर गोगावले यांना विचारले असता, गुलाबराव पाटील यांना कदाचित त्याची भनक लागली असावी, असे ते म्हणाले. राजकारणात सकाळचा संध्याकाळी आणि संध्याकाळचा सकाळी कुठे असेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे भविष्यात काय घडेल, हे सांगता येणार नाही. मात्र, सध्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे चित्र दिसत नाही. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती आपल्याला मिळालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रायगडमध्ये महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळला आहे. टोरंट प्रकल्प आणि निवडणुकीतील मदतीवरून आमदार अनिकेत तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या वादावर बोलताना गोगावले यांनी प्रकल्पांचे समर्थन केले. प्रकल्प उभे राहिले तरच रोजगार निर्माण होतील. वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्षलागवड केली जाईल. जिल्ह्यात वीज आणि पाणी उपलब्ध करून दिले नाही, तर उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत जातील. उद्योग आणि धरण्ो नसतील तर सुबत्ता कशी येणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्यासाठी कामही केले होते, असे गोगावले यांनी सांगितले. महायुतीतील घटक पक्षांमधील वाद तात्त्विक असले, तरी प्रत्येकाने युतीधर्म पाळला पाहिजे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी तटकरेंना लगावला.

बंद कंपन्यांना पुन्हा उभारी देणार
एमआयडीसी क्षेत्रातील बंद पडलेल्या कंपन्या पुन्हा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महाडमधील बंद पडलेल्या 20 कंपन्या अन्य उद्योजकांनी ताब्यात घेतल्या आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातील इतर बंद कंपन्यांची पाहणी करून त्या पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जमीन संपादन होऊनही प्रकल्प सुरू न झालेल्या ठिकाणांची पुढील आठ दिवसांत पाहणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. आगामी प्रकल्पांच्या सद्यःस्थितीचाही आढावा घेतला जाणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
Exit mobile version