| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रणधुरंधर स्पोर्ट्स क्लब पाली यांच्यावतीने तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. 9 रोजी क्रीडा संकुल, पाली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम लढत आपटवणे विरुद्ध रासळ एन या संघात झाली. अटीतटीच्या लढतीत आपटवणे संघाने विजेतेपदावर नाव कोरले.
या स्पर्धेत तालुक्यातील 32 नामवंत संघांनी प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेसाठी सुधागडातील कबड्डीप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत आपटवणे विरुद्ध रासळ एन या संघात झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी बहारदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेचा अंतिम विजयी कालभैरव आपटवणे हा संघ ठरला. या संघास रोख रक्कम 11 हजार 111 रु. व आकर्षक चषक, तर उपविजेता जय हनुमान रासळ एन या संघास रोख रक्कम 7 हजार 777 रु. व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी नाथभैरव झाप, तर चतुर्थ क्रमांकावर भैरवनाथ वावे या संघाला समाधान मानावे लागले. या दोन्ही संघांना प्रत्येकी 5 हजार 555 व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे, उत्कृष्ट चढाई अथर्व खाडे, तर उत्कृष्ट पक्कड जयेश खाडे, पब्लिक हिरो रोशन ठाकूर या सर्व खेळाडूंना आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.





