| रसायनी | प्रतिनिधी |
चौक खालापूर परिसरात खोटे आमिष दाखवून, पैसे दुप्पट करून देणे, महागडी भेट वस्तू देणे, परतावा चांगला देतो असे खोटे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे.
चौक खालापूर परिसरात असा गुन्हा करणाऱ्या श्वेता अभिषेक प्रभू, देवेन्द्र चंद्रकांत सरदार, पंकज अशोक शाह, आकाश बळीराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी सावी कन्सलटन्सी इंटरप्रायजेस व स्वामीश कन्सलटन्सी प्रा.ली. या नावाने नोंदणी प्रमाणपत्र मिळवून चौक व खालापूर येथे कार्यालय उघडले. त्यांना नागरिकांकडून ठेव स्वरूपात रक्कम स्विकारण्याचा अधिकार नसताना 17 महिन्यांसाठी गुंतवणूक रकमेवर 6 टक्के व्याज व मुळ गुंतवणूक केलेली 6 टक्के रक्कम अशी एकूण 12 टक्के रक्कम परतावा देण्याचे अमिष कंपनीच्या एजंट मार्फत सर्वसामान्यांना देण्यात आले. नागरिकांडून जवळपास ठेव स्वरूपात 16 लाख 75 हजार रुपये स्विकारून गुंतवणूक दारांना त्यांचे पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेनंतर तात्काळ त्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आहवान करण्यात येते की, ज्या नागरिकांची सावी कन्सलटन्सी इंटरप्रायजेस चौक व स्वामीश कन्सलटन्सी खालापूर यांनी आर्थिक फसवणुक केली आहे, अशा नागरिकांनी खालापूर पोलीस ठाणे, रायगड दृष्टी व्हॉटसप ॲप, जनसपंर्क अधिकारी व नियंत्रण कक्षाला कॉल करून किंवा समक्ष भेटून तक्रारीची नोंद करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे.







