अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाची परवानगी न घेता सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत शाळांमध्ये करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओवे येथील मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल, तळोजा येथील काळसेकर इंग्लिश मिडियम स्कूल, अर्कम इंग्लिश स्कूल, ओशीन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल व दि वेस्ट हिल हाय इंटरनॅशनल स्कूल आणि कळंबोली येथील ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूल या शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांना अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये करू नयेत. पालकांना कळविण्यात येते की, आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत असताना या शाळा अधिकृत असल्याची खात्री करावी. ज्या पालकांनी आधीच या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांनी तात्काळ तो रद्द करून अधिकृत शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असून, शिक्षणाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version