पालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व संबंधित पालकांना महापालिकेच्यावतीने आयुक्त प्रशासक मंगेश चितळे यांनी सूचित केले आहे की, त्यांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नये. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजिकच्या अन्य मान्यता प्राप्त शाळेत समायोजन करण्यात येईल. संबंधित अनधिकृत शाळांविरूध्द दंडात्मक कारवाई केली जाईल.
शाळांचे प्रवेश (अॅडमिशन) सुरू होण्यापूर्वी व शाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रातील सात अनधिकृत शाळांची नावे घोषित करण्यात येत आहेत. यामध्ये मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, काळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोजा पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, ओशीन ब्राईट कॉनव्हेंट स्कूल तळोजा, ऑक्सफोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल कळंबोली, बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा, दि वेस्ट हिल हाय. इंटरनॅशनल स्कूल तळोजा या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे.
पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश (अॅडमिशन) या शाळांमध्ये करू नये, असे आवाहन उपायुक्त प्रसेनजित कारलेकर यांनी केले आहे. जर या शाळांमध्ये अगोदरच प्रवेश झाले असतील, तर ते प्रवेश अधिकृत शाळेत होण्यासाठी इतर नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचे नियोजन करण्यात येईल. यानंतरदेखील काही अनधिकृत शाळा आढळून आल्यास त्यांची नावे घोषित करून त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली आहे.
अनधिकृत शाळांची यादी
मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल, ओवे, काळसेकर इंग्लिश मिडियम स्कूल, तळोजा पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल, तळोजा, ओशीन ब्राईट कॉनव्हेंट स्कूल, तळोजा, ऑक्सफोर्ड इंग्लिश मिडियम स्कूल, कळंबोली, बजाज इंटरनॅशनल स्कूल, तळोजा, दि वेस्ट हिल हाय. इंटरनॅशनल स्कूल, तळोजा.