| अलिबाग | वार्ताहर |
भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद, उदया प्रकल्प कार्यालय अलिबाग टाटा कम्युनिकेशन्स मुंबईद्वारा आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ईडीआयआयद्वारा प्रशिक्षित महिला उद्योजकांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी जिल्हा ग्रामीण विकास संस्था, रायगड प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा उद्योग केंद्र रायगड व्यवस्थापक इंद्रायणी लोटणकर, भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश सोळंकी उपस्थित होते.
यावेळी उद्योजिका पल्लवी जोशी, प्रार्थना नागवेकर-अलिबाग, उमा कुसमुडे-खारघर, किर्ती बिरवाडकर-मुरूड, प्रीतम मालकर-अलिबाग यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ईडीआय प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश सोळंकी यांनी उदया प्रकल्पाची यशोगाथा विशद केली. तसेच, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती देऊन व्यवस्थापक इंद्रायणी लोटणकर यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी आजच्या युगात महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे असून उद्योजकीय क्षेत्रात प्रगती करण्याची गरज आहे. बाजारपेठेची गरज ओळखून आपला व्यवसाय निवडावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.