| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. ही कोंडी सुरळीत करण्यासाठी मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व रायगड जिल्हा वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी शहरामधील मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकानदारांना पत्रक काढून आपल्या दुकानात माल उतरविणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. तरी वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर वाहतूक कोंडीबाबत दुकानदारांनी योग्य दक्षता घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले.
बाजारपेठेतील सरू असलेल्या दुकानांमध्ये माल पुरवठा करणारी वाहने सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी उभी करून माल चढविणे-उतरविणे करण्यात येत आहे. यामुळे सतत वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना होणारा त्रास तसेच आपत्कालीन वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत आहे. याबाबत तोंडी सुचना देऊनही हा प्रकार सुरुच असल्याने ही बाब गंभीर व कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. तरी अंतिम सुचना असून आपण कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी माल उतरविण्यासाठी वाहने उभी करु नयेत. तुम्हाला मला उतरविण्यासाठी नियोजित जागेत व अत्यल्प वेळेत पूर्ण करावी. गर्दीच्या वेळेत माल चढविणे- उतरविणे पुर्णतः बंद ठेवावे. या सुचनांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई, वाहन जप्ती व दंड आकारण्यात येईल, यांची गंभीर नोंद घ्यावी. वाहतूक सुरळीत ठेवणे हा सार्वजनिक हिताचा विषय असून यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तरी दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे करण्यात आले आहे.







