पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी ‘यांची’ नियुक्ती

| पुणे | प्रतिनिधी |
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित अशोक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या मालेगाव बुद्रुक येथील रणजित तावरे यांना संधी मिळाली आहे. बारामती तालुक्यातील माळेगावच्या बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोक तावरे यांची बिनविरोध पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पदी निवड झाली आहे.

अजितदादांच्या जागेवर पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आज बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार यांच्या सूचनेनुसार रणजित तावरे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. बँकेचे चेअरमन दिंगबर दूर्गाडे यांनी सूचक तर दत्तामामा भरणे यांनी अनुमोदन दिले. ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे गेले 17 वर्ष अध्यक्ष राहिलेले बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोक तावरे हे आज बिनविरोध निवडून आले आहेत. रणजित अशोक तावरे हे व्यवसायाने मोठे उद्योजक आहेत. पुण्यात त्यांची 15 टाटाची शोरूम आणि पेट्रोल पम्प आहेत. त्यासोबत छोटे मोठे व्यवसाय पण आहेत. त्यासोबत गेली 5 वर्ष ते राजहंस दूध संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहतात. बरोबरच प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन म्हणून दोन वर्ष काम पाहत आले आहेत.

Exit mobile version