वन्यजीव बचाव करणार्‍या संस्थांचा सत्कार

सेवा संकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम; संस्थेचे महाराष्ट्रभर कार्य सुरू

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सेवा संकल्प प्रतिष्ठान ही संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यास वाहून घेतलेली संस्था आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवा, महिला कल्याण, नागरी समस्या, ग्राहक संरक्षण, शेतकरी कल्याण अशा विविध 12 विभागांवर संस्थेचे भरीव कार्य अवघ्या महाराष्ट्रभर सुरू आहे. सेवा संकल्प प्रतिष्ठान (रजि) ही संस्था मुंबईमध्ये स्थित असून डॉ. कृष्णाजी दाभोळकर हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. डॉ प्रसाद दाभोळकर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून संस्थेचे काम पाहतात.

अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील वन्यजीव बचाव आणि त्याबद्दल प्रबोधन करत असणार्‍या गुणी कार्यकर्त्यांचा तसेच रायगड जिल्ह्यात कार्यरत वन्यजीव बचाव व समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या संस्थांचा सत्कार रविवारी (दि.19) अलिबाग येथे करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक अ‍ॅड. अमित चव्हाण, प्रख्यात बालरोगतज्ञ आणि जेष्ठ पक्षी निरीक्षक डॉ. वैभव देशमुख, ज्येष्ठ सर्प अभ्यासक प्रदीप कुळकर्णी, अलिबागमधील व्यावसायिक आणि प्राणीमित्र मंदार गडकरी, मिलिंद कवळे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग ही संस्था अनेक वर्षांपासून वन्यजीव बचाव आणि त्यांच्यावर उपचाराचे काम करत आहे. तसेच निसर्गासोबत सहजीवन ह्यासाठी प्रबोधनात्मक व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित करत आहे. संस्थेत कार्यरत 36 सक्रिय कार्यकर्त्यांचा ह्या प्रसंगी सत्कार करण्यात आला. पनवेल येथील नेचर फ्रेंड सोसायटी, उरण येथील फ्रेंड्स ऑफ नेचर, अलिबागमधील वाइल्ड लाईफ वॉरियर्स आणि रोहा येथील ऑर्गनायझेशन फॉर वाइल्डलाइफ स्टडीज (OWLS) ह्या संस्थांचा देखील प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

सेवा संकल्प प्रतिष्ठान (रजि) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृष्णाजी दाभोळकर, विप्रदास परुळेकर, विवेक ठवाल, शुभांगी दाभोळकर, अशोक साष्टे, संदेश थळे श्रृती दाभोळकर, नारायण भट, अरुणकुमार तिवारी, विजय महिमकर इ. मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version