। म्हसळा । वार्ताहर ।
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरमाला योजनेंतर्गत मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील जेटीना मंजुरी द्या, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र सरकार कडे केली आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून दरवर्षी 30 लाख प्रवाशांची जलवाहतूक होते.वाढत्या प्रवासी संख्येमुळे येथील पाच टर्मिनल अपुरी पडत आहेत. त्यामुळे रेडीओ क्लब येथे सुसज्ज जेटी बांधण्यात यावी. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान सुरु असलेल्या रो-रो सेवेतून हजारो वाहनांची ने-आण केली जात आहे. यामुळे मांडवा ते अलिबाग येथील रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे त्यामुळे मांडवा ते अलिबाग रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे. मुरुड येथील जंजिरा किल्ल्याला दरवर्षी साडे सात लाख पर्यटक भेट देतात. मात्र किल्ल्यावर उतरण्यासाठी जेटी उपलब्ध नाही, त्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची वाहतुक सुरळीत होण्यासाठी सागरमाला योजनेतून जेटी मंजूर व्हावी, त्याचबरोबर मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ल्यावरही उतरण्यासाठी, रत्नागिरीतील सुवर्ण दुर्ग किल्ल्यांसाठी जेटी मंजूर व्हावी, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.