कोलाड पाटबंधारेचा मनमानी कारभार

वारंवार तक्रार करून पाणीगळती बंद होईना

| कोलाड | वार्ताहर |

कोलाड पाटबंधारे विभागाकडून कुंडलिका सिंचनातून बारमाही वाहत असलेला उजवा तीर समजणार्‍या कालव्यातून आरसीएफ कंपनीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे कालव्याला मोठ्या प्रमाणात गुरूळ पडल्यामुळे पाणीगळती होऊन हे पाणी राऊत बाग पुई येथे राहणार्‍या विनायक सोसायटीच्या बंगल्याच्या चारही बाजूला शिरते. या पाण्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याविषयी कोलाड पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात वारंवार तक्रार करण्यात आली; परंतु पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत आहे. या पाण्याच्या गळतीमुळे होत असलेला नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला असून, संबंधित विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

डोळवहाल बंधारा तसेच कुंडलिकेच्या सिंचानातून कोलाड पाटबंधारे तसेच जलसिंचन विभागामार्फत अनेक वर्षांपासून आरसीएफ कंपनीला पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु कुंडलिका नदीच्या उजवा तीरावरील पाटबंधारे खात्याच्या याच कालव्याची डागडुजी अथवा दुरूस्ती अनेक वर्षांपासून केली गेली नाही, यामुळे ठिकठिकाणी कालव्याला गेलेले गुरूळ अथवा त्याला लागलेल्या गळतीमुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

गेली दहा ते बारा वर्षांपूर्वी या कालव्याच्या पाण्यावर रोहा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन भिजत होती. यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. याशिवाय लोकांना पिण्यासाठी पाणीही मुबलक प्रमाणात मिळत होते. विहिरीही तळ गाठत नव्हत्या. गुरेढोरे यांच्या चारा व पाणी याचाही प्रश्‍न सुटत होता. आता परिस्थिती उलट झाली आहे. शेतकर्‍यांसाठी शेतीला पाणी नाही; परंतु धनदांडग्यांसाठी पाणी मुबलक हे व्यावसायिक धोरण पाटबंधारे खात्याने स्वीकारले आहे. त्यात कालव्यात कित्येक गुरुळ आणि त्याला लागलेली गळती या सांडपाण्यामुळे लगतचे शेतकरी आणि ग्रामस्थ नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत अनेक निवेदन दिली, तक्रारी केल्या, मात्र यावर या खात्याचे अधिकारी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यास तयार नाहीत. ते निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे या गळक्या पाण्याच्या नाहक त्रासामुळे आता येथील शेतकरी आणि ग्रामस्थ नागरिक अधिक आक्रमक झाले आहेत.

कुंडलिका सिंचनातून वाहणारा उजवा तीर कालवा अतिप्रमाणात पाणी गळतीमुळे राऊत बाग येथे राहणार्‍या विनायक सोसायटीच्या बंगल्याच्या आजूबाजूला पाणीच पाणी होत आहे. याबाबत कोलाड पाटबंधारे खात्याकडे वारंवार तक्रार करून संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

गीता गौतम जाधव, तालुकाध्यक्षा,
वंचित बहुजन आघाडी
Exit mobile version