संरक्षक भिंती, वाड्याच्या चिरा ढासळल्या; भारतीय पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
| महाड | उदय सावंत |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा पाचाड येथे राजवाडा आहे. मात्र, या राजवाड्याचे अवशेष आता अखेरच्या घटका मोजत आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेले हे ऐतिहासिक संरक्षित स्थळ शासन, लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील राजवाड्यात छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामाता वास्तव्यास होत्या. किल्ले रायगड पाहायला येणारा प्रत्येक शिवभक्त या राजवाड्याला आणि राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळाला भेट देऊन नतमस्तक झाल्याशिवाय परतत नाही. शेकडो वर्षांनंतरदेखील या वाड्याचे अवशेष कायम असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये या राजवाड्याच्या अवशेषांच्या संवर्धनाकडे भारतीय पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
एकीकडे शासनाने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून येथील रस्ते, किल्ल्याच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि उत्खननावर करोडो रुपये खर्च केलेले आहेत. परंतु, या राजवाड्याच्या उभारणीकडे मात्र दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत. काही वर्षांपूर्वी याच राजवाड्याच्या शेजारी रायगड महोत्सवाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. तात्पुरत्या स्वरूपामध्ये या राजवाड्यावर आणि किल्ले रायगडावर आकर्षक वीज व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या राजवाड्याच्या संरक्षक भिंती आणि आतील वाड्यांच्या जोत्यावर उगवलेले गवत काढायलादेखील वेळ नसल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणेच राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळावरदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमादरम्यान या समाधीस्थळाचा ताबा नक्की कोणाकडे आहे, असा जाब स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला होता.
शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी
पाचाड येथील राजवाड्याच्या संरक्षक भिंती पावसात सातत्याने कोसळत आहेत. राजवाडा परिसरामध्ये उगवणारे गवत, भिंतीवर वाढलेली रोपटी आजही जशीच्या तशीच आहे. राजवाड्याच्या आतील परिसरात असलेल्या विहिरी त्याचप्रमाणे घरांचा पाया दिवसेंदिवस ढासळत आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून मुख्य रस्ता ते राजवाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी फक्त पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, आतील बाजूस असलेल्या वास्तूंना पुन्हा उभे करण्याबाबत कोणतेच नियोजन अद्याप झालेले नाही. या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेला लोखंडी दरवाजादेखील कापडी चिंधीने बांधला आहे. तसेच, मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेला फलकदेखील ‘जिजामाता वाडा’ अशा एकेरी स्वरूपात लावण्यात आलेला आहे. त्याबाबत शिवप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
किल्ले रायगडावर आलो असता राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याला भेट दिली. परंतु, या राजवाड्याची झालेली दुरवस्था पाहून अत्यंत दुःख झाले. राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट मोडकळीस आला आहे. तसेच, परिसराबाबत माहिती देणारे नामफलकदेखील कुठेही नाहीत. राजवाड्यात सगळीकडे गवत आणि रोपटी उगवलेली आहेत. त्यामुळे पुरातत्व विभाग कशाचे संवर्धन करते, असा प्रश्न पडला आहे.
– शंतनु वाघमारे, शिवप्रेमी, पुणे







