श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना

सलामी सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

| रोहा/चणेरा | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी (दि.21) पहाटे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्यावतीने रोहा पोलीस निरीक्षक अभय शेलार व पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती.

या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगीत फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. बुधवारी भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर धाविर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्त झाली. हा सशस्त्र सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. तीन वर्षांपूर्वी मंदिरासमोरील सभामंडप हटविण्यात आले आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजूला बैठक गॅलरी करण्यात आल्याने भक्तांची मोठी गैरसोय दूर झाली असून, भक्तांना गॅलरीत बसून मानवंदना पाहता आली. यावेळी मंदिरात पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, विश्वस्त नितिन परब, विजय मोरे आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्तांना दर्शन देत ही पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदीरात परतते. यावेळी पून्हा महाराजांना पोलीस मनवंदना देण्यात येते. या पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठीकठीकाणी फुलांनी आणि सडारांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणी विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली रोषनाई या सोहळयाला एक वेगळे रूप प्राप्त करून देत आहे. रोह्यात पालखीच्या दर्शनासााठी येणाऱ्या भाविकांसाठी जैन संघटना, रोटरी क्लब, प्रकाश जैन इत्यादी विविध सामाजिक मंडळांमार्फत शहरात ठिकठिकाणी थंडपेये, चहा आणि अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच, येथील अशिर्वाद मंडळातर्फे भाविकांसाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेली मोफत भोजन व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.

Exit mobile version