लिंबू टिंबू संघासोबत लाजिरवाणा पराभव
| डब्लिन | वृत्तसंस्था |
पाकिस्तान संघाने गेल्या सहा महिन्यांत केवळ कोच, कर्णधारच नाही तर निवडकही बदलले आहेत. आणि टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने आर्मी स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले. मात्र, संघाची स्थिती जैसे थेच आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानला आयर्लंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने एक चेंडू बाकी असताना 5 विकेट्सने शानदार विजय नोंदवला. या सामन्यात पाकिस्तानचे स्टार गोलंदाज आयर्लंडच्या फलंदाजांसमोर हतबल दिसले.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 182 धावा केल्या होत्या. कर्णधार बाबर आझमने 57, तर सैम अयुबने 45 धावा केल्या. इफ्तिखार अहमदने 37 आणि शाहीन आफ्रिदीने 14 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आयरिश संघासमोर पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजांनी पाणी मागायला सुरुवात केली. शादाब खान चांगलाच महागात पडला. त्याने 4 षटकात 54 धावा दिल्या. आणि त्याला विकेट पण मिळाली नाही. नसीम शाहने 4 षटकात 37 धावा दिल्या. पण नसीमला एकच विकेट मिळाली. तर शाहीन आफ्रिदीने 4 षटकात 26 धावा दिल्या, मात्र त्याला एकच यश मिळू शकले. इमाद वसीमने एक विकेट तर अब्बास आफ्रिदीला 2 बळी मिळाले, पण तेही खूप महागडे ठरले.