आरोग्य केंद्र न्यायालयाच्या कचाट्यात

जमिनीच्या वादावरुन बांधकामाला स्थगिती

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील दिघोडे येथील प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पुन्हा रखडले आहे. जमिनीच्या वादावरून शेतकर्‍यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने हे बांधकाम रखडले आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत या आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यासाठी 4 कोटी 82 लाखांची निविदा काढण्यात आली होती.

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी या आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा शुभारंभदेखील करण्यात आला होता. उरण तालुक्याचा सध्या औद्योगिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. या तालुक्याची ग्रामीण भागाची लोकसंख्या जवळ जवळ दोन लाखांच्या आसपास आहे. शासनाच्या धोरणानुसार साधारणपणे 30 हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. मात्र, उरण तालुक्यात कोप्रोली हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे कोप्रोलीच्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी आरोग्य केंद्र उभारावीत, अशी मागणी सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनीकडून करण्यात येत होती. माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि जि.प. सदस्या कुंदा ठाकूर यांनी ते सदस्य असताना ही मागणी सातत्याने लावून धरली होती.

पाच वर्षांपूर्वी ही जागा जिल्हा परिषदेने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, स्थानिक शेतकर्‍याने या जागेवर हरकत घेऊन आपला अधिकार सांगितल्यामुळे हे काम आता थांबले होते. आता मात्र तहसीलदारांनी ही जागा शासनाची असल्याचा निर्णय दिल्यानंतर आरोग्य केंद्र बांधण्याच्या हालचालींना वेग आला. एक मजली ही इमारत असणार असून, येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी राहण्याची सोय असणार आहे. या आरोग्य केंद्रामुळे उरण पूर्व भागातील आदिवासींना मोफत उपचार मिळू शकणार आहेत. उरण पूर्व भागात रानसई, जांभूळपाडा, कंठवली, चिरनेर, वेश्‍वी या ठिकाणी आदिवासींची मोठी संख्या आहे. त्यांना उरण पनवेल येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी जावे लागते. या आरोग्य केंद्रामुळे त्यांचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. मात्र, नेहमी कोणत्यातरी अडथळ्यात अडकलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र आता न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने ते कधी पूर्ण होणार आणि त्याचा लाभ येथील गोरगरीब जनतेला कधी मिळणार याबाबत साशंकता निर्माण आहे. तसेच ज्या काही समस्या आहेत, त्या मार्गी लावून हे आरोग्य केंद्र लवकरच मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दिघोडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन होऊन बांधकामाला सुरुवात झाली होती. मात्र, येथील एका शेतकर्‍याने या जमिनीवर आपला हक्क सांगितला असून, त्यांनी या बांधकामाला न्यायालयात स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे हे बांधकाम थांबले आहे. सरकारी वकील आपली बाजू मांडत असून, न्यायालयाने ही स्थगिती उठविल्यानंतर लगेच बांधकामाला सुरुवात होईल.

राजाराम भोसले, वैद्यकीय अधिकारी, कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र
Exit mobile version