| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एकाच दिवसात तळोजा आणि खारघर परिसरात दोन वेगवेगळ्या कारवाया करुन अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकासह दोघांना अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या दोन्ही कारवायांमध्ये तब्बल 20 लाख 80 हजार रुपये किमतीचे 208 ग्रॅम वजनाचे एम.डी. (मेफेड्रॉन) असे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
तळोजा फेज 1 मधील मेट्रो शेड समोरील गामी रोडवर एक नायजेरीयन व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि त्यांच्या पथकाने दुपारी तळोजा फेज- 1 भागात सापळा लावला होता. यावेळी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ओनयेंका क्लेमेंट ईग्बोईजे (39) नामक नायजेरीयन नागरिक संशयास्पदरित्या सदर भागात आला असता, अंगली पदार्थ विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 10 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 103 ग्रॅम वजनाचे एम. डी. (मेफेड्रॉन) पदार्थ आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन त्याला अटक केली.
या कारवाईनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर सेक्टर 33 मधील बागेश्री अपार्टमेंटजवळ 17 ऑगस्ट रोजी रात्री सापळा लावून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या हबीब अजीज चौधरी (39) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 10 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 105 ग्रॅम वजनाचे एम. डी. आढळून आले. सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन त्याला अटक करण्यात आली. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोपडे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, शिंगे आणि त्यांच्या पथकाने केली. या दोन्ही कारवायांमध्ये अटक करण्यात आलेल्या दोघांवर अनुक्रमे तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.