सात मोटारसायकल केल्या जप्त
| पनवेल | वार्ताहर |
मोटारसायकलची चोरी करून फरार असलेल्या दोन सराईत अल्पवयीन चोरांना अटक करण्यात गुन्हे शाखा नवी मुंबईच्या पथकाला यश आले आहे. या अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 4 लाख 55 हजारांच्या सात मोटारसायकल जप्त केल्या आहेत. तळोजा, खारघर आणि बेलापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सरफराज उर्फ अप्पू साबीर शेख (17, रा.खारघर) तसेच राहील वसीम शेख (17, रा. कर्जत) असे पकडलेल्या अल्पवयीन आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही आरोपी शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबर मोजमज्जा करण्यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला असल्याचे समोर आले आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी संगनमताने तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, तळोजा शहरातील 1 लाख किमतीची स्कुटी चोरली होती, त्या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याबाबत अधिक तपास करत असताना वाहनचोरी शोध पथक गुन्हे शाखा नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई, पोलीस हवालदार प्रशांत काटकर, किरण राऊत, रवींद्र काळे यांसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा शोध सुरू केल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी खारघर आणि कर्जत येथून दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आणि या दोन आरोपींकडून 4 लाख 55 हजारांच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत.