| पनवेल | वार्ताहर |
खारघर सेक्टर-15 मधील घरकुल कॉर्नरलगत असलेल्या स्वर्णगंगा ज्वेलर्ससमोरील चौकात पनवेल महापालिकेमार्फत ट्राफिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात येत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खारघर सेक्टर-15 मधील स्वर्णगंगा ज्वेलर्ससमोरील चौकात खारघर सेक्टर 13- कडून घरकुल, डी मार्ट आणि कोपरा पूलमार्गे पनवेल तर खारघर सेक्टर 18, 19 मधील रहिवासी पनवेल, मुंबईकडे जाताना डी मार्टकडून कोपरामार्गे बाहेर पडतात. या रस्त्यावर चारही बाजून येणाऱ्या वाहनांमुळे सदर चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते. याशिवाय सदर रस्त्यावर डी मार्ट आणि इतर शोरुम, रुग्णालय असल्यामुळे वाहनांची नेहमीच वर्दळ होते. सदर चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. या मागणीची दखल घेऊन महापालिकेच्या माध्यमातून स्वर्णगंगा ज्वेलर्ससमोरील चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार असल्याने नागरिक समाधानी झाले आहेत.