| अलिबाग | प्रतिनिधी |
बेकायदेशीररित्या अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ऑनलाईन खरेदी केला जात होता. त्यानंतर मुंबईतून ट्रान्सपोर्टद्वारे कारखान्यात तो माल पाठविला जात होता. कच्चा माल पाठविणाऱ्याला खोपोली पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले. न्यायालयाने त्याला दि.19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे.
चंद्रमणी मातामणी तिवारी असे या आरोपीचे नाव आहे. हा मूळचा कांदिवलीमधील रहिवासी आहे. मुख्य आरोपी ॲन्थोनीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून त्याची ओळख आहे. अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व विविध रसायनांचा पुरवठा तो ॲथोनीला करीत होता. त्याच्या मागणीनुसार रसायने तो ऑनलाईन मागवित होता. त्यानंतर मुंबईतून ट्रान्सपोर्टद्वारे खोपोलीमध्ये हा माल पाठवित जात होता. रसायने ऑनलाईन खरेदीसाठी लागणारे जीएसटी नंबर तो वेगवेगळ्या ओळखीच्या व्यक्तींकडून घेत होता. अखेर त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.
आतापर्यंत 325 कोटीचा मुद्देमाल जप्त खोपोली येथील ढेकू गावाजवळ आंचल केमिकल नावाने केमिकल बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अमली पदार्थ बेकायदेशीररित्या तयार केले जात होते. खोपोली पोलिसांनी छापा टाकून आतापर्यंत 325 कोटी रुपयांहून अधिक साठा जप्त केला. त्याच अमली पदार्थांसह कच्च्या मालाचा समावेश आहे.