फरार आरोपींना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार- मनोज जरांगे

| बीड | प्रतिनिधी |

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. वाल्मीक कराड याला सीबीआयने ताब्यात घेतले असून, कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि. 1) मस्साजोग येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. तर दुसरीकडे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली, अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला.

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. जरांगे पाटील म्हणाले, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अजूनही मुख्य आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक होऊन न्याय मिळावा, अशी आमची इच्छा आहे. वाल्मीक कराड याला अटक झाली आहे. आता मोठे मासे सापडतील, आरोपींना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. या प्रकरणात पोलीस कुणालाही सोडणार नाहीत. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला, यावर बोलताना जरांगे म्हणाले, चौकशी सुरु आहे. संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच. यामध्ये जे जे येतील त्यांना सुट्टी दिली तर महाराष्ट्र बंद पाडणार, असे ही जरांगे पाटील म्हणाले.

25 जानेवारीपासून उपोषण
मराठा आरक्षणावर बोलताना जरांगे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी येणार्‍या 25 तारखेपर्यंत काय निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष लागले आहे. 25 जानेवारीपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहे. याआधीही सरकारमध्ये हेच लोक होते, आथा फक्त खांदे बदलले आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले.
Exit mobile version