विनयभंग करणार्‍याला अटक करा : अ‍ॅड. मृणाल खोत

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करणार्‍या अव्वल कारकूनावर तातडीने निलंबन व अटकेची कारवाई करण्यात यावी. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा अ‍ॅड. मृणाल खोत यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत मुरुड तहसीलदार व पोलिसांना निवेदन देण्यात येऊन भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अव्वल कारकून केतन भगत यांनी महिला कर्मचार्‍याला वारंवार मानसिक त्रास देऊन तिचा आपल्या कार्यालयात कामावर रुजू असताना विनयभंग केला आहे. सदर बाब ही अतिशय गंभीर असून, अतिशय लज्जास्पद आहे. घडल्या प्रकाराबाबत या महिला कर्मचारीने मुरुड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देऊनदेखील त्याबाबत आजपर्यंत कोणतीही कायदेशीर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आरोपी केतन भगत हा आजही समाजात मोकाट वावरत आहे. तरी सदर गुन्हेगार केतन भगत यांस तातडीने अटक करण्यास सहकार्य करुन सदर गुन्हेगारास तातडीने निलंबनाची कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे अ‍ॅड. मृणाल खोत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्य महिला आयोग (मुंबई), मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक रायगड यांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी अ‍ॅड. मृणाल खोत, महिला शहर अध्यक्षा प्रमिला माळी, मुरुड तालुका युवक अध्यक्ष मनीष माळी, तालुका सरचिटणीस विजय पैर, मजगाव ग्रामपंचायत सदस्य योगेंद्र गोयजी, शीतल घरत, कुमुदिनी जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version