। पनवेल । वार्ताहर ।
वाशीतील जुहूगावात राहणार्या एका 23 वर्षीय तरुणाने वाशी परिसरात रहाणार्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे. निलेश जाधव (23) असे या तरुणाचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याला विनयभंगासह बलात्कार व पोक्सो कलमाखाली अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी निलेश जाधव हा तरुण जुहूगावात तर पीडित मुलगी वाशी परिसरात रहाण्यास आहे. या दोघांची पुर्वीपासून तोंडओळख असल्याने आरोपी निलेश याने पीडित मुलीला फुस लावून तिच्यासोबत प्रेमसंबध निर्माण केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत मोबाईलवर चॅटींग करुन तिच्यासोबत अधिक जवळीक निर्माण केली. त्यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपी निलेश याने पीडित मुलीसोबत फोनवरुन चॅटींगद्वारे तसेच तिचा पाठलाग करुन झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना अथवा घरी आई-वडिलांना सांगू नये यासाठी त्याने पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने आपल्या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपुस केल्यानंतर पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी निलेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.