| पनवेल | वार्ताहर |
राहत्या घराच्या दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेले 100 तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने घरफोडी चोरी करणार्या आरोपीला मानपाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. टिळकनगर पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे अमित अशोक झोपे हे त्यांचे परीवारासह पुणे येथे कार्यक्रमासाठी गेले असता, त्यांच्या राहते घराचे दरवाजाचे लॅच कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडून घरात प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेले 100 तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने घरफोडी चोरी करुन नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रीक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अभिजीत अलोक रॉयला कामाठीपुरा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 712 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 257.89 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा चोरीस गेलेला जसाचातसा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणी केलेल्या घरफोडी चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीचा सोन्याचे दागीने गाळण्याचा व्यवसाय असुन त्यात त्याला नुकसान झाल्याने तो घरफोडी चोरीचे गुन्हे करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच आरोपी इम्रान अबलेश खान आणि रियाज रमजान खान यांना देखील घरफोडीच्या गुन्हयात अटक करण्यात आले.