श्रीवर्धन बाजारपेठेत आपट्याच्या पानांची आवक

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

स्नेह, आपुलकी आणि नात्यांमधील कटुता दूर करून गोडवा निर्माण करणाऱ्या विजयादशमीच्या सणासाठी श्रीवर्धनची बाजारपेठ सज्ज झाली आहे. दसऱ्यानिमित्त एकमेकांना ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ म्हणत आपट्याची पाने देण्याची परंपरा आजही उत्साहाने जपली जाते. या पारंपरिक ‘सोन्या’ची बाजारपेठेत आवक सुरू झाली असून, फांदीच्या जुडीचा दर मात्र, 20 रुपये असा माफक आहेत.

हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. सायंकाळी सीमोल्लंघनानंतर आपट्याची पाने देवाला अर्पण केली जातात. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांना ही पाने देऊन शुभेच्छा दिल्या जातात. जुन्या आठवणींसह राग-लोभ आणि हेवेदावे विसरून नात्यांमध्ये स्नेह वाढवण्याचा संदेश या परंपरेतून दिला जातो.

दसऱ्याच्या आधीपासून ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी महिला आपट्याची पाने विक्रीसाठी बाजारपेठेत आणतात. सणाच्या पार्श्वभूमीवर पानांच्या विक्रीला सुरुवात झाली असली, तरी एका जुडी मागे मिळणारी वीस रुपयांची रक्कम पाहता विक्रेत्यांचे उत्पन्न मर्यादितच राहते. दिवसभर मेहनत करून मिळणारा हा हंगामी रोजगार आणि सणाच्या निमित्ताने मिळणारे उत्पन्न, यावर अनेक छोट्या विक्रेत्यांची भिस्त असते. दसऱ्याच्या आनंदात आपट्याच्या पानांना मोठे सांस्कृतिक महत्त्व असले, तरी पाने गोळा करताना झाडांच्या फांद्या तोडल्याने पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडांना इजा न करता फांद्या गोळा करण्याचे आणि वृक्षसंवर्धनाचे आवाहन केले जात आहे. डिजिटल शुभेच्छांचा वापर वाढत असला, तरी प्रत्यक्ष भेटून आपट्याची पाने देण्यातील आपुलकी आजही कायम आहे.

Exit mobile version