शिरोड्यात आढळला दुर्मिळ पाणचिरा
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
अतिशय दुर्मिळ व धोक्यात आलेली प्रजाती म्हणून संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या इंडियन स्कीमर म्हणजेच पाणचिरा या पक्ष्याचे शिरोडा समुद्रकिनारी दर्शन झाल्याने सिंधुदुर्गची किनारपट्टी ही दुर्मिळ जैवविविधतेसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात या पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही ही पहिलीच नोंद आहे. अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
हिवाळी वातावरण सुरू झाल्याने व थंडीची चाहूल लागताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक देशी, विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणथळ पक्ष्यांचा समावेश आहे. फ्लोमिंगो, उचाट्या, हळदीकुंकू बदक, वारकरी बदक, थापट्या बदक, सीगल, पाणटिवळा, तुतारी टिळवा, चिखल्या या पक्ष्यांच्या विविध प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर दिसत आहेत. अशातच अतिशय दुर्मिळ अशा पाणचिरा या हिवाळी स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा समुद्रकिनारी झाल्याने पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्यासाठी ही आनंदाची व आश्चर्यची बाब ठरली आहे. पाणचिरा या पक्ष्याच्या वीण वसाहती प्रामुख्याने मध्य प्रदेशातील चंबल नदीचे खोरे आणि ओडिशामध्ये आहेत. अगदी तमिळनाडूमधूनही त्यांच्या नोंदी असल्या तरी, त्या एक किंवा दोन पक्ष्यांचा आहेत. त्यामुळे या पक्ष्याच्या हिवाळी स्थलांतराचा विस्तार मोठा असला तरी, संख्येने एक दोन पक्षी स्थलांतरित झालेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या क्वचितच नोंदी होतात. उरण येथील पाणजे पाणथळ क्षेत्रामध्ये दोन पाणचिरा पक्षी दिसल्याच्या नोंदी आहेत. पालघरच्या किनाऱ्यावरून देखील या पक्ष्याच्या नोंद आहे.
पाणचिरा विषयी पाणचिरा पक्षी चंबल नदी आणि ओडिशामधील काही भागात वाळूच्या बेटांवर आपली घरटी तयार करतात. साधारण फेब्रुवारीपासून ते या वीण वसाहतीमधील ठिकाणी परतायला सुरुवात करतात. ओडिशामध्ये एप्रिलमध्ये त्यांची वीण आढळते. ऑगस्टमध्ये ते वीण वसाहती सोडून हिवाळी स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. चंबल येथे टॅग करण्यात आलेले पाणचिरा पक्षी हे गुजरातचा किनारा, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगेच्या खोऱ्यात आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी आढळून आले आहेत.