। डेहराडून । वृत्तसंस्था ।
उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या आर्या बोरसेने अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास मिळते, असे आपण नेहमी म्हणतो. हा प्रत्यय आर्या बोरसे हिच्याबाबत येथे दिसून आला. नेमबाजीमधील मधल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या आर्याने शेवटच्या टप्प्यात अचूक नेम साधला आणि महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पदक खेचून आणले.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेंजवर आर्या बोरसेने 252.5 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच पदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक जिंकणार्या आर नर्मदा या तामिळनाडूच्या खेळाडूने 254.4 गुणांची नोंद केली. पात्रता फेरीत आर्याने दुसरे स्थान घेत अंतिम फेरीसाठी प्रवेश निश्चित केला होता. पहिल्या टप्प्यात तिने अन्य दोन खेळाडू समवेत आघाडी घेतली होती. मात्र अठराव्या नेमच्या वेळी ती चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी तिला पदक मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती तथापि तिने शेवटच्या चार नेममध्ये अतिशय संयम आणि आत्मविश्वास दाखवीत पदक खेचून आणले.
पदकाची खात्री होती- आर्या गतवेळच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला पदक मिळवता आले नव्हते त्याची खंत मला सतत जाणवत होती. यंदा या स्पर्धेमध्ये आपण पदक जिंकायचेच या दृष्टीने मी भरपूर सराव केला होता. त्यामुळेच पदक जिंकण्याची मला खात्री झाली होती, असे आर्याने सांगितले. यंदा जागतिक स्पर्धांसाठी होणार्या भारतीय संघाच्या निवड चाचणीत भाग घेत सर्वोत्तम यश मला मिळवायचे आहे. अर्थात ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत पदक मिळवणे हे माझे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने माझी वाटचाल असेल, असे तिने सांगितले.
आर्या ही 22 वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या खेलो इंडिया शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे. महाविद्यालयाकडून तिला भरपूर सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच मी फक्त नेमबाजीच्या सरावावर लक्ष ठेवू शकते, असे आर्याने स्पष्ट केले आहे.
रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने अंतिम फेरीत
आंतरराष्ट्रीय खेळाडू रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने यांनी पुरुषांच्या दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत पाटील याने 633.8 गुणांसह अव्वल स्थान घेतले आहे, तर पार्थ हा तिसर्या क्रमांकावर असून त्याचे 632.6 गुण झाले आहेत.