| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता महाकुंभमध्ये मोठी आगीची घटना घडली. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. महाकुंभमध्ये एकामागून एक दुर्घटना घडत असल्याने भक्तांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
महाकुंभचा हा सेक्टर 22 परिसर झूसीच्या छतनाग घाट आणि नागेश्वर घाटाच्या मध्ये आहे. गुरुवारी दुपारी अचानक अनेक तंबूंनी पेट घेटला. त्यामुळे तंबूत असलेले भाविक घाबरून बाहेर पळाले. ही आग अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. कापडी तंबू असल्याने आणि हवा असल्याने आग अधिकच भडकली. यावेळी अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आगीत असंख्य तंबू जळून खाक झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं.