नऊ वर्षांत तब्बल वीस लग्न

नालासोपाऱ्यातील भामट्याच्या मुसक्या आवळल्या

| पालघर | वार्ताहर |

नालासोपाऱ्यातील एका भामट्याने महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह अनेक राज्यांमधील 20 हून अधिक महिलांसोबत लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत एका महिलेने पोलीसांत तक्रार केली असता पोलिसांनी या भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या भामट्याचे नाव फिरोज शेख असे असून त्याने देशभरात तब्बल 20 महिलांशी लग्न करून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. नालासोपारा येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या भामट्याचा शोध घेत अनेक पुरावे आणि मोठ्या शोधमोहिमेनंतर पालघर पोलिसांनी दि.23 जुलै रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज शेख हा प्रामुख्याने विधवा महिलांना लक्ष्य करायचा. तो आधी या महिलांशी ऑनलाईन मैत्री करायचा. यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करायचा.

नालासोपारा येथील एका महिलेने तक्रारीत म्हटले होते की, एका मेट्रिमोनियल साइटद्वारे तिची आणि फिरोजची ओळख झाली होती. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. ऑक्टोबर व नोव्हेंबर 2023 दरम्यान तिने त्याला तब्बल 6.5 लाख रुपये व अनेक मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. हे सगळे घेऊन तो फरार झाला होता.

फिरोजकडील मुद्देमाल जप्त
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भागल म्हणाले, आम्ही फिरोज शेखविरोधात याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, त्याच्याकडील लॅपटॉप, मोबाईल फोन, डेबिट व क्रेडिट कार्ड, चेकबूक, दागिन्यांसह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच त्याने अनेक महिलांची फसवणूक करून मिळवलेला ऐवजही जप्त केला आहे.
नऊ वर्षांत 20 लग्नं
पोलिसांनी सांगितले की, फिरोज प्रामुख्याने विधवा महिलांना लक्ष्य करायचा. वधू-वर सूचक संकेतस्थळांवरून त्यांच्याशी मैत्री करायचा, त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी लग्न करायचा. लग्न झाल्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, तर काही वेळा चोरायचा. पैशांसह दागिने व इतर मौल्यवान वस्तू घेऊन तो पसार व्हायचा. तो 2015 पासून असे प्रकार करत आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये त्याने 20 लग्नं केली आहेत.
Exit mobile version