| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
ऑक्टोबर हिटचा उकाडा संपला आहे. सध्या वातावरणात बदल होते असून, जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सकाळी व रात्री गारवा पडत आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी व रात्री तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत उतरते.
जिल्ह्यात पहाटे सर्वत्र धुक्याची दुलई पसरत आहे. अल्हाददायक वातावरणाचा पर्यटक व प्रवाशी मनसोक्त आनंद लुटत आहेत. दुपारी सुद्धा वातावरणात गारवा जाणवत आहे. याशिवाय डोंगरावर विशेषतः पांढऱ्या शुभ्र व करड्या रंगांचे ढग दाटून येत आहेत. जणूकाही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखीच बहारदार होतो. त्यामुळे येथून प्रवासी व पर्यटक सुद्धा ढग, हिरवाई, व धुक्याचा आनंद घेत आहेत. ट्रॅकिंग व पर्यटनासाठी हे वातावरण उत्तम आहे. त्यामुळे बरेचसे ट्रेकर व पर्यटक किल्ले, डोंगर, समुद्रकिनारा आदी ठिकाणी भटकंती करत आहेत. आणि या अद्भुत निसर्गाची मज्जा लुटतात. ताम्हाणी घाट, वरंध घाट व मोर्बे घाट येथून प्रवास करतांना ढगांची अनुभूती मिळत आहे. असंख्य पर्यटक येथे आवर्जून थांबून मज्जा लुटत आहेत. शिवाय रायगड, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड, कर्नाळा इत्यादींसह जिल्ह्यातील इतरही उंचावरील किल्ल्यांवर ढग व धुके पसरलेले असते. त्यामुळे येथे येणारे दुर्गप्रेमी व ट्रेकर्स दुर्गभ्रमंती बरोबरच ढगांची व धुक्याची अनुभूती घेतात. ताजे व प्रफुल्लीत करणारे हे वातावरण सर्वांनाच आकृष्ट करत आहे. प्रफुलित करणारे वातावरण आणि दिवाळीच्या सुट्ट्या यामुळे जिल्ह्यात पर्यटन वृद्धि सुद्धा होताना दिसत आहे.
ऑक्टोबर संपताच थंडीची चाहूल
