| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा व रसायनी परिसरात अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध नसल्यामुळे व तशी सोय नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना अतिशय धावपळ करावी लागते. त्यांना ही लाकडे पनवेल येथून मागवावी लागतात. त्यामुळे खूप गैरसोय होत असून स्थानिक ग्रामस्थांसह मृताच्या घरातील नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याअगोदर माजी आमदार मनोहर भोईर यांच्या प्रयत्नातून व राकेश खराडे यांच्यावतीने नवीन स्मशानभुमीचे बांधकाम करण्यात आले होते. तसेच, शेजारी जुनी स्मशानभुमीजागी नव्याने स्मशानभुमी बांधकाम अंतिम टप्यात आहे. या स्मशानभुमीवर मोहोपाडा, शिवनगर, आळी अ़ाबिवली, नविन पोसरी, मोहोपाडा वासांबे वाडी, शिंदीवाडी, खोंडावाडी, शिवनगर वाडी व आसपासच्या परिसरातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र, लाकडांसाठी स्थानिकांना व नातेवाईकांना इतरत्र शोध घ्यावा लागतो. त्यासाठी मोहोपाडा येथील स्मशानभूमीत एक मोठी खोली बांधून त्याच्यामध्ये लाकडे ठेवण्याची सोय करावी, असा मोहोपाडा गावकीने ठराव केला असून स्थानिक सदस्यांकडे यासाठी स्मशानभुमीजवळ खोली बांधकाम करुन देण्याची मागणी केली आहे.