| म्हसळा | वार्ताहर |
खारगाव खुर्द सकलप येथील शेतकरी मंगेश म्हात्रे यांनी दोन दिवसांपूर्वी शेत नांगरून झाल्यानंतर बैलजोडी चारा खाण्यासाठी सोडून दिली होती. मात्र, सायंकाळी त्यातील एक बैल घरी परत आला नसल्याने त्याचा शोध घेतला असता सापडला नाही. अखेर मंगेश म्हात्रे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
म्हसळा पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आणि त्यांच्या पथकाने शहरातील गुप्त माहितीगारांचे मदतीने म्हात्रे यांचा चोरीला गेलेला नांगरणीचा बैल कोणी बांधून ठेवला आहे का, याचा शोध घेतला. याबाबतचा सुगावा चोरट्यांच्या कानावर पडला असावा. आपल्यावर कारवाई होईल या भितीने चोरट्यांनी बांधून ठेवलेला बैल दुसऱ्या दिवशी सोडून दिला. तो बैल स्वतःहून मंगेश म्हात्रे यांच्या घरी पोहचला. म्हसळा पोलिसांनी शिताफीने शोध चक्र सुरु केल्याने मृत्यूच्या दाडेत गेलेला नांगरणीचा बैल वाचला. बैल परत जीवंत सापडला असल्याने म्हसळा पोलिसांचे कामाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे.